अमरावती महानगरपालिका व पी. आर. पोटे कॉलेज यांच्यात सामंजस्य करार – विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण प्रकल्पांची संधी

अमरावती महानगरपालिका, अमरावती आणि पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, अमरावती यांच्यामध्ये आज महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) स्वाक्षरीत झाला.
या कराराचा उद्देश राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० अंतर्गत शैक्षणिक आणि औद्योगिक सहकार्य वाढविणे हा आहे. यामुळे अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना नागरी आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार असून त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येणार आहे.
कराराअंतर्गत विद्यार्थी खालील प्रकल्प राबविणार आहेत –
१. शहर बससेवा डिजिटायझेशन
२. डिजिटल लायब्ररी निर्मिती – नागरिकांना ऑनलाइन वाचनाची सुविधा उपलब्ध
करून देण्यासाठी पुस्तकांचे डिजिटल स्वरूपातील repository तयार करणे.
३. आयुक्त कार्यालयासाठी व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि तांत्रिक ज्ञान अधिक समृद्ध होणार असून, महानगरपालिकेच्या सार्वजनिक सेवांच्या गुणवत्तेतही लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे.
या सामंजस्य करारावर पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. पी. एम. जवांधिया आणि अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक (भा.प्र.से.) यांनी स्वाक्षरी केली.
महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक (भा.प्र.से.) यांनी निर्देश दिले की, विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रकल्प हे प्रत्यक्ष व्यवहारात उपयुक्त ठरतील, याची खात्री करून त्यावर काम करावे. प्रत्येक प्रकल्पाच्या कार्यवाहीदरम्यान नियमित प्रगती अहवाल (Progress Report) सादर करावा. शहर बससेवा डिजिटायझेशन प्रकल्पात नागरिकांना सुलभ, जलद व पारदर्शक सेवा मिळेल यावर लक्ष केंद्रित करावे. डिजिटल लायब्ररीतून सर्व वयोगटातील नागरिकांना ज्ञानसंपदा उपलब्ध होईल, यासाठी विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश करावा. आयुक्त कार्यालयासाठी तयार होणाऱ्या व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीममध्ये सुरक्षा, पारदर्शकता व सुलभता या तत्त्वांचा विचार करून प्रणाली विकसित करावी. सर्व प्रकल्प नागरिकाभिमुख असावेत व त्यातून महानगरपालिकेच्या सेवांची गुणवत्ता वाढेल याची विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना महानगरपालिकेतील अधिकारी व विभागीय प्रमुखांचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून त्यांना वास्तवातील कामकाजाची ओळख होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रभावकारिता व कार्यक्षमतेचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल सुचवावेत.
महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक (भा.प्र.से.) यांनी आवाहन केले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची आणि समाजासाठी उपयुक्त काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प हे केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीच नव्हे तर नागरिकांसाठीही उपयुक्त ठरणार आहेत.
सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्‍यात येत आहे की, त्यांनी मनापासून आणि जबाबदारीने या प्रकल्पांवर काम करावे, नावीन्यपूर्ण कल्पना साकाराव्यात आणि शहराच्या प्रगतीत आपला मोलाचा सहभाग नोंदवावा.
तसेच नागरिकांनाही आवाहन करण्‍यात आले की, त्यांनी या उपक्रमांना सकारात्मक सहकार्य द्यावे, जेणेकरून अमरावती महानगरपालिकेच्या सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, वेग आणि कार्यक्षमता निर्माण होईल.
एकत्रित प्रयत्नांमुळे आपण अमरावतीला आधुनिक, स्मार्ट आणि नागरिकाभिमुख शहर बनवू शकतो.
यावेळी उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, पी आर पोटे अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती तर्फे प्राचार्य डॉ पी एम जावंधियां, उप प्राचार्य डॉ. मो. झुहेर, डीन अकॅडमिक्स डॉ शहाकार, डॉ नंदा, प्रा अभिषेक लाडोळे, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top