अमरावती – अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ३ (दस्तूरनगर) अंतर्गत शहरातील स्वच्छता, सुव्यवस्था आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आज कडक कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईत अनधिकृत पोस्टर आणि बॅनर तसेच रस्त्यांवर असलेले अतिक्रमण लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित कार्यवाही केली. शहरातील विविध इलेक्ट्रिक खांबांवर आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत पोस्टर व बॅनर हटवून एकूण १०८ बॅनर जप्त करण्यात आले. याचबरोबर मालटेकडी परिसरातील रस्त्यावर असलेल्या फ्रूट व भाजीपाला गाड्या आणि इतर अतिक्रमण साहित्य जप्त करण्यात आले.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, शहरातील स्वच्छता, नियमांचे पालन आणि वाहतुकीची सुरक्षिता सुनिश्चित करणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे. झोन प्रशासनाच्या निर्देशानुसार ही कारवाई रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी करण्यात आली आहे.
महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले की, अनधिकृत पोस्टर-बॅनर आणि रस्त्यांवरील अतिक्रमण टाळावे, तसेच प्रशासनास सहकार्य करून शहराची स्वच्छता, सुव्यवस्था आणि नियमांचे पालन सुनिश्चित करावे.








