दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आमदार संजय खोडके आणि आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. शहरातील नागरी सुविधांची गुणवत्ता सुधारण्यासाठी झालेल्या या बैठकीत महापालिका प्रशासनाला प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
ही बैठक मनपाच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, डॉ. मेघना वासनकर, नरेंद्र वानखडे आणि यश खोडके यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीत नूतन प्रशासकीय इमारतीच्या नेहरू मैदानातील प्रस्तावावर, अंबादेवी–एकविरा देवी मंदिर विकास आराखड्यावर, तसेच स्वच्छता, कर वसुली, बांधकाम आणि शिक्षण विभागाशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
आमदार सुलभाताई खोडके यांनी सर्व यंत्रणांनी समन्वय साधून नागरी सुविधांची तातडीने पूर्तता करावी, अशी सूचना केली. तर आमदार संजय खोडके यांनी प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी दूर करून बांधकाम, स्वच्छता आणि कर वसुलीची गती वाढवावी, अशी सूचना दिली. शिवटेकडी व वडाळी तलाव परिसराचा पर्यटन स्थळाप्रमाणे विकास, चौकांचे सौंदर्यीकरण आणि शाळांच्या सुविधांचा दर्जा उंचावण्याबाबतही निर्णय घेण्यात आले.
बैठकीच्या शेवटी आमदारांनी नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करून शहराचा सर्वांगीण विकास साधावा, असे निर्देश दिले. मनपा प्रशासनाने सर्व विभागांनी मिळून “स्वच्छ, सुबक आणि सक्षम अमरावती” या ध्येयासाठी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.






