अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जयस्तंभ चौक व वसंत टॉकीज परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या तक्रारींचा सखोल आढावा घेतला. पाहणीदरम्यान त्यांनी नाल्यांची स्वच्छता, रस्त्यांची स्थिती आणि परिसरातील स्वच्छतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ कारवाईचे निर्देश दिले.
आयुक्तांनी सफाई कामगारांची तत्काळ नेमणूक करून नाल्यांची पूर्ण स्वच्छता करण्याचे आदेश दिले तसेच परिसरातील नागरिक व दुकानदारांना स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. “नागरिकांच्या समस्या वेळेत ऐकून त्वरित उपाययोजना करणे हे महापालिकेचे प्राधान्य आहे,” असे आयुक्त शर्मा चांडक यांनी सांगितले.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, नाल्या आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी एक निश्चित वेळापत्रक तयार करून अंमलबजावणी केली जाईल. तसेच नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी अधिकारी नियमित निरीक्षण करतील.
महापालिका आयुक्तांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की, आपल्या परिसरातील स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कचरा योग्य ठिकाणी टाकावा, तसेच अनधिकृत कचरा फेकणाऱ्यांविरोधात तत्काळ माहिती द्यावी. दुकानदारांनी आपल्या परिसराची स्वच्छता राखावी, जेणेकरून शहर सुरक्षित आणि आरोग्यदायी राहील.




