शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सकाळी शहरातील विविध भागांची पाहणी केली आणि नागरिकांना स्वच्छतेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
आयुक्तांनी वेलकम पॉईंट, रहाटगाव रोड, नागपूर रोड आणि विभागीय आयुक्त कार्यालय परिसर या भागांतील रस्ते, नाले, कचरापेट्या आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छतेची स्थिती तपासली. त्यांनी संबंधित अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांना आवश्यक त्या सूचना देत तत्काळ सुधारणा करण्यास सांगितले.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक म्हणाल्या, “शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाने त्यात आपला वाटा उचलणे आवश्यक आहे. कचरा नियोजित ठिकाणी टाका, प्लास्टिकचा वापर टाळा आणि परिसर स्वच्छ ठेवा — हेच ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’चे खरे सूत्र आहे.”
त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
सध्या महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि वसाहतींमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यात कचरा संकलन, रस्ते धुणे, झाडांची छाटणी, नाल्यांची स्वच्छता आणि जनजागृती उपक्रमांचा समावेश आहे. आयुक्तांनी स्वच्छता कामकाज नियमित आणि प्रभावीपणे चालविण्याचे निर्देश दिले आहेत.
पाहणीदरम्यान सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक राजू डिक्याव, स्वास्थ निरीक्षक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.




