अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कर वसुली, प्रलंबित कर प्रकरणे आणि आगामी महसूल वाढीच्या नियोजनासंदर्भात एक महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कर विभागातील सर्व टॅक्स वसुली लिपिक उपस्थित होते.
बैठकीत आयुक्तांनी कर वसुली प्रक्रियेचे सध्याचे चित्र, प्रलंबित कर प्रकरणांची स्थिती आणि वसुलीतील अडचणींचा आढावा घेतला. तसेच प्रलंबित थकबाकी तातडीने वसूल करण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्याचे निर्देश देण्यात आले. महसूलवाढीसाठी झोनस्तरावर समन्वय वाढवून वसुलीची गती वाढवण्याचेही आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेच्या कर वसुली व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आयुक्तांनी तंत्रज्ञानाचा वाढीव वापर, स्वयंचलित प्रणालींचा समावेश आणि नागरिकांना पारदर्शक व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. कर भरण्यासंबंधी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्याची सूचना त्यांनी केली.
महापालिकेने प्रत्यक्ष भाडेकराराऐवजी क्षेत्रफळावर आधारित “अपेक्षित भाडे दर” प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मालमत्ताधारकांनी या सुधारित पद्धतीनुसार त्वरित कर भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.
दरम्यान, अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक मालमत्ता सर्वेक्षणादरम्यान वाणिज्यिक इमारतींमधील मूळ मजल्याच्या क्षेत्रफळाच्या ५०% पेक्षा कमी आणि ७ फूटांपेक्षा कमी उंचीच्या पोटमाळ्यांवरील कर आकारणी कमी करण्यात आली आहे. यापूर्वी कर भरला असल्यास, ती रक्कम अग्रिम समायोजन म्हणून दाखल केली जाईल. यासाठी संगणकीय प्रणाली, नोंदी आणि ऑनलाइन कर भरणा प्रणाली अद्ययावत करण्याचे कार्य सध्या सुरू आहे.


