दि. 14 नोव्हेंबर 2025 | अमरावती शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर अंकुश ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेकडून धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. पादचारी मार्ग, रस्त्यांच्या कडेला तसेच सार्वजनिक जागांवर करण्यात आलेल्या लोखंडी शेड, काँक्रीट ओटे, टिनशेड, अवैध खोके आणि झोपड्यांवर आज मोठी कारवाई करण्यात आली.
माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार आजच्या कारवाईत जेसीपी व चार ट्रकच्या सहाय्याने जमील कॉलनी मुख्य रस्ता ते ताज नगर पुलापर्यंत, तसेच वलगाव रोड परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली असून ही मोहीम शहरातील रस्ते व फूटपाथ पूर्णपणे मोकळे होईपर्यंत अविरत सुरू राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी दिली.
“ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी ते तत्काळ स्वतःहून काढून घ्यावे; अन्यथा महानगरपालिका ते हटवेल आणि कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल,” असा इशारा सहाय्यक आयुक्तांनी दिला. या इशाऱ्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
लवकरच शहरातील मुख्य कापड बाजारातील अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात येणार असून, त्यापूर्वी इतर प्रभागांतील अतिक्रमणे पूर्णतः हटविण्याचे नियोजन आहे.
महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, नागरिकांच्या सोयीसाठी, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोहीम अत्यावश्यक आहे. पादचारी व रस्त्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांना अतिक्रमणांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने ही निर्णायक कारवाई हाती घेण्यात येत आहे.









