अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित “हॅपी स्ट्रीट्स” उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहाटेपासून मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट परिसरात फिटनेस, कला, संगीत आणि सामाजिक संदेशांची रंगतदार मेजवानी अनुभवण्यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता Amravati Road Runners च्या 20 किमी धावण्याने झाली. त्यानंतर घेतलेल्या 2.5 + 2.5 किमी फेरीनं नागरिकांमध्ये फिटनेसची प्रेरणा निर्माण केली. 6.30 वाजता संदीप मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्र पार पडले, तर 7.00 ते 7.50 दरम्यान कविता शेंडे आणि विजयालक्ष्मी यादव यांच्या झुंबा वर्कआउटने वातावरण उत्साहाने भरून गेले. दिशा संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेल्या “स्वच्छ अमरावती – सुंदर अमरावती” पथनाट्याने प्रभावी जनजागृती केली. यावेळी धावपटूंच्या 3 सहभागीं आणि 8 सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या स्टेजवर 7.15 पासून 10 मजेदार खेळांचे आयोजन करण्यात आले, ज्यात मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी आनंदाने भाग घेतला. 7.30 वाजता Amravati Cycling Association च्या सायकलपटूंनी स्लो सायकलिंगचे कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिक सादर केले.
तिसऱ्या स्टेजवर 6.30 पासून ऋषिकेश होले यांच्या लाइव्ह आर्केस्ट्राने सकाळ संगीताने उजळली. त्यानंतर फिजिकल फिटनेस अँड सेल्फ-डिफेन्स ट्रेनिंग सेंटर, बडनेरा यांच्या वतीने लाठी-काठी, दांडपट्टा, गटका यांसारख्या पारंपरिक मर्दानी खेळांची थरारक सादरीकरणे झाली.
कुटुंबांसह सकाळचा आनंद घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी या सर्व उपक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला. मुलांचा उत्साह, तरुणांचे सहभाग, ज्येष्ठांचा योगाभ्यास आणि फिटनेसप्रेमींची उपस्थिती यामुळे “हॅपी स्ट्रीट्स” उपक्रमाने “निरोगी अमरावती”चा संदेश अधोरेखित केला. मनपाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पडला. हा उपक्रम पुढील आठवड्यांतही सुरू राहील, अशी माहिती मनपाने दिली.
या प्रसंगी आयुक्त सौम्या शर्मा चांडक म्हणाल्या, “हॅपी स्ट्रीट्ससारखे उपक्रम प्रगतिशील शहरांच्या आरोग्यदायी संस्कृतीला बळकटी देतात. नागरिकांनी दिलेला उत्साहवर्धक प्रतिसाद पाहून ‘निरोगी अमरावती’चे स्वप्न अधिक दृढ झाले आहे. रस्ते ही शहराच्या सामाजिक जीवनाला जोडणारी खुले प्रांगणे आहेत—याची आज सर्वांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतली.”
त्यांनी नागरिकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे, नियमित व्यायाम-योग-धावणे यांना दैनंदिन जीवनात स्थान देण्याचे आणि स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पाळण्याचे आवाहन केले. “हॅपी स्ट्रीट्स हा फक्त कार्यक्रम नाही, तर अधिक उत्साही, सुरक्षित आणि आरोग्यदायी अमरावतीकडे नेणारी सामूहिक चळवळ आहे,” असे त्यांनी सांगितले.










