अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता उपक्रमाला गती देण्यासाठी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी फ्रेजरपुरा परिसरातील कचरा संकलन व्यवस्थेची पाहणी केली.
आयुक्तांनी कचरा संकलन प्रक्रिया, वाहने, यंत्रसामग्री, संकलन केंद्रांची मांडणी आणि कर्मचारीवर्गाचे कामकाज यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. वेळापत्रकाचे पालन, कचराविल्हेवाट पद्धती आणि कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचीही माहिती घेतली.
वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहतुकीच्या ताणाचा कचरा संकलनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यांनी संबंधित विभागाला सुधारणा करण्याचे निर्देश दिले. रस्त्यांवरील अडथळे दूर करणे आणि संकलन केंद्रांच्या आसपास स्वच्छता राखण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
संकलन केंद्रात अनधिकृत प्रवेश टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी गेट बसविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या उपाययोजनेमुळे शिस्तबद्धता आणि नियंत्रण वाढेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका स्वच्छ आणि सुव्यवस्थित अमरावतीच्या दिशेने सतत प्रयत्नशील आहे. आजची पाहणी फ्रेजरपुरा परिसरातील कचरा व्यवस्थापन आणखी प्रभावी करण्यास मदत करणार आहे.




