अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व निष्पक्ष राहावी, या उद्देशाने आज बुधवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी संनियंत्रण समितीची सविस्तर व महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
ही बैठक निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
बैठकीत निवडणूक काळात कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी स्थिर निगराणी पथक (Static Surveillance Team), भरारी पथक (Flying Squad Team) व व्हिडीओ सर्वेक्षण पथक (Video Surveillance Team) सक्रिय ठेवण्यात येणार असून, बेकायदेशीर मद्यसाठा, रोख रक्कम, प्रचार साहित्य तसेच अन्य वस्तूंच्या वाहतुकीवर कडक नजर ठेवली जाणार आहे.
निगराणी पथकांकडून जप्त करण्यात येणाऱ्या मद्य, रोख रक्कम व इतर साहित्यावर तात्काळ व नियमानुसार कार्यवाही होण्यासाठी स्वतंत्र संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे.
कोणतीही कार्यवाही झाल्यास संबंधित पथकांनी त्वरित समितीला माहिती देणे बंधनकारक असून, अहवाल प्राप्त होताच कोणताही विलंब न करता तत्काळ निर्णय घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असल्याने कोणत्याही प्रकारची हयगय, दुर्लक्ष अथवा आचारसंहितेचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने व जबाबदारीने काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
यावेळी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ही पूर्णतः पारदर्शक, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज आहे.
नागरिकांनीही निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करावे व आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास त्वरित प्रशासनाच्या निदर्शनास आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, विनय ठमके, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती (संनियंत्रण समिती अध्यक्ष), उपायुक्त योगेश पिठे, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, श्रीमती शिल्पा पवार (वरिष्ठ कोषागार अधिकारी), संजय नेवारे, राजेश दुधे आदी समिती सदस्य व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



