आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडणे, या उद्देशाने आज बुधवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त राकेश ओला व निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक होते.
निवडणूक काळात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य आव्हानांचा आढावा घेत प्रशासन व पोलीस यंत्रणेमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीत संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, प्रचारादरम्यान उद्भवू शकणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या बाबी, सभा, रॅली, मिरवणुका तसेच सोशल मीडियावरील अफवा व गैरप्रचार रोखण्यासाठी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सांगितले की, निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असून, प्रतिबंधात्मक कारवाई, वाढीव गस्त, संशयितांवर लक्ष व कायद्याचा भंग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्यात येतील.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे यासाठी प्रशासन सर्व आवश्यक सुरक्षा व सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.
निवडणूक प्रक्रिया पूर्णतः निष्पक्ष व पारदर्शक राहील यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, पोलीस उपायुक्त, महानगरपालिका उपायुक्त, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततापूर्ण निवडणूक पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






















