आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेतील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी आज गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी मनपातील विविध विभागांना भेट देत सखोल पाहणी केली.
या पाहणीदरम्यान माहिती कक्ष, निवडणूक विभाग, भांडार विभाग व नगरसचिव विभागातील निवडणूक विषयक कामकाजाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत निवडणूक तयारी, कागदपत्रांची स्थिती, मनुष्यबळ नियोजन तसेच आवश्यक साहित्याच्या उपलब्धतेबाबत माहिती जाणून घेतली.
माहिती कक्षात निवडणूक संदर्भातील माहिती संकलन व नोंदी वेळेत आणि अचूक उपलब्ध राहतील, यावर त्यांनी भर दिला. निवडणूक विभागात मतदार यादी, कर्मचारी नेमणूक, प्रशिक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत चर्चा करण्यात आली.
भांडार विभागात निवडणुकीसाठी आवश्यक साहित्य व उपकरणांच्या उपलब्धतेची तपासणी करून कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी आगाऊ नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
नगरसचिव विभागात निवडणूक अधिसूचना, पत्रव्यवहार व कायदेशीर बाबींचा आढावा घेत सर्व कामकाज नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडण्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.
या पाहणीमुळे अमरावती महानगरपालिकेतील निवडणूक तयारीला गती मिळाली असून प्रशासन अधिक सक्षमपणे निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सज्ज असल्याचे चित्र दिसून आले.
या वेळी शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, नगरसचिव संदीप वडुरकर तसेच मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







