अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत शहरात व्यापक मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली इर्वीन चौक परिसरातील सेंट कॅथेड्रल चर्चमध्ये ख्रिसमस दिनानिमित्त विशेष मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या वेळी उपस्थित नागरिकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी मतदार हक्क बजावण्याची शपथ घेत लोकशाही बळकट करण्यासाठी सक्रीय सहभागाची ग्वाही दिली. मतदानाचे महत्त्व, जबाबदार नागरिक म्हणून भूमिका तसेच निर्भय व निष्पक्ष मतदानाचे आवाहन यावेळी करण्यात आले.
उपस्थित नागरिकांना निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मतदार नोंदणी, मतदानाचा दिनांक तसेच मतदान करताना पाळावयाच्या नियमांची माहिती देण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी उपस्थितांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक अमरावतीकर मतदाराने मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
प्रत्येकाने ‘मतदान दूत’ म्हणून पुढाकार घेऊन इतर नागरिकांनाही मतदानासाठी प्रेरित करावे, असा संदेशही त्यांनी दिला.
सामाजिक एकोपा, लोकशाही मूल्ये आणि नागरी कर्तव्य यांचा सुरेख संगम साधणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.



