अमरावती शहरात अन्नकचरा व्यवस्थापनासाठी ठोस पावले; हॉटेल वेस्ट व बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनाबाबत मनपात महत्त्वपूर्ण बैठक

अमरावती शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, लॉन्स, केटरिंग, कॅन्टीन, होस्टेल तसेच हॉकर्स व हातगाडी व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणात अन्नकचरा व ओला-सुका कचरा निर्माण होत असून, काही ठिकाणी या कचऱ्याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ व स्वच्छ भारत अभियान (SBM) 2.0 च्या नियमांनुसार न लावता बेकायदेशीररित्या टाकली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेत हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट व बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट संदर्भात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, अमरावती रेस्टॉरंट अँड लॉजिंग असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र सलुजा, तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, बीअर बार, लॉन्स, केटरिंग, कॅन्टीन, होस्टेल, फूड बँक सेवाभावी संस्था, हॉटेल वेस्ट कंत्राटदार व मनपाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

हॉटेल वेस्ट व्यवस्थापनाबाबत महत्त्वाचे निर्णय

बैठकीत पुढील ठोस निर्णय घेण्यात आले—

– १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या बल्क वेस्ट जनरेटरांनी ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत स्वरूपात ठेवणे बंधनकारक.

– हॉटेल/किचन वेस्टसाठी स्वतंत्र कंटेनर आणि प्लास्टिक, पत्रावळी, डिस्पोजेबल साहित्य यासाठी वेगळे कंटेनर ठेवणे अनिवार्य.

– हॉकर्स झोनमध्ये मोठे ड्रम बसविण्याची जबाबदारी हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट कंत्राटदारांवर राहील.

– मंगल कार्यालये व लॉन्समधील उरलेले चांगले अन्न फेकून न देता फूड बँक व सेवाभावी संस्थांमार्फत गरजू नागरिकांना वितरित करण्यात येईल. यासाठी अशा संस्थांची मनपात नोंदणी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार कोल्ड चेन (फ्रीज) सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

– सर्व आस्थापनांनी मनपाने नियुक्त केलेल्या हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट कंत्राटदारालाच कचरा देणे बंधनकारक राहील. नियमभंग केल्यास दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.

– व्यावसायिक भागात दिवसातून दोन वेळा घंटागाडीमार्फत ओला व सुका कचरा संकलन करण्यात येईल.

– मंगल कार्यालये व लॉन्समध्ये कार्यक्रमाच्या दिवशी दिवसातून एकदा हॉटेल वेस्ट संकलन केले जाईल.

– भाजी मंडईतील ग्रीन वेस्ट तसेच मंदिरांतील निर्माल्य उचलण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवर राहील.

– जनजागृतीसाठी हस्तपत्रके वितरित करून आस्थापनांकडून वर्गीकृत कचरा संकलन सुनिश्चित करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येईल.

शहर स्वच्छ, आरोग्यदृष्ट्या सुरक्षित व शिस्तबद्ध ठेवण्यासाठी सर्व संबंधित आस्थापनांनी अमरावती महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top