अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ही पारदर्शक, निर्भय, मुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून काटेकोर तयारी करण्यात येत आहे.
या तयारीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून मतदान प्रक्रियेत थेट सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी (१, २ व ३) यांच्यासाठी सखोल व प्रात्यक्षिक स्वरूपातील प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत सांस्कृतिक भवन व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे हे प्रशिक्षण पार पडले. विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
प्रशिक्षणात मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदान केंद्रावरील जबाबदाऱ्या, मतदारांची ओळख तपासणी, मतदार यादी हाताळणी, आचारसंहिता, आपत्कालीन परिस्थितीतील कार्यवाही तसेच कायदेशीर बाबी यावर भर देण्यात आला.
विशेषतः ITI येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणांच्या प्रत्यक्ष हाताळणीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. या सत्रात तहसीलदार विजय लोखंडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची भूमिका निवडणुकीच्या यशात निर्णायक असते.
कोणतीही चूक, गोंधळ अथवा तांत्रिक अडचण टाळण्यासाठी प्रशिक्षण अत्यावश्यक असून, ईव्हीएम–व्हीव्हीपॅटचे अचूक ज्ञान, नियमांचे पालन आणि मतदारांशी सौजन्यपूर्ण वागणूक यामुळेच निवडणूक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह ठरते.
प्रशिक्षणात दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून मतदानाच्या दिवशी निष्पक्ष व जबाबदार भूमिका पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सांस्कृतिक भवन व ITI येथे आयोजित करण्यात आला असून, यात शंका-निरसन व परिस्थितीवर आधारित सराव घेण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, विविध झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणामुळे मतदान कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढून निवडणूक प्रक्रिया अधिक कार्यक्षम, पारदर्शक व त्रुटीमुक्त पद्धतीने पार पडण्यास मदत होणार असून, अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.











