अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत.
मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप (SVEEP) विभागामार्फत शहरातील गर्दीच्या ठिकाणी जाऊन थेट नागरिकांपर्यंत पोहोचत मतदार जनजागृती केली जात आहे.
या उपक्रमाचाच एक भाग म्हणून बडनेरा येथील आठवडी बाजारात पथनाट्याच्या माध्यमातून ग्राहक, व्यापारी, नागरिक व मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली.
पथनाट्यात मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील प्रत्येक मताची ताकद तसेच मतदान न केल्यास होणारे परिणाम प्रभावी आणि समजण्यास सोप्या पद्धतीने मांडण्यात आले.
मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असली तरी प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावणे का आवश्यक आहे, याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
या उपक्रमाला बाजारात उपस्थित नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



