अमरावती मनपाची प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात धडक कारवाई; १२७० किलो प्लॅस्टिक जप्त; नियमभंग करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कार्यवाही

आयुक्त सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या ठोस मार्गदर्शनाखाली अमरावती महानगरपालिकेमार्फत शहरात प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात जोरदार आणि सातत्यपूर्ण मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता कडवी बाजार परिसरातील श्री. कृष्ण मिनी ट्रान्सपोर्ट येथे अचानक छापा टाकण्यात आला.

या कारवाईत १२७० किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांवर नियमानुसार ₹५,०००/- इतका पहिला दंड ठोठावण्यात आला आहे.

याच मोहिमेअंतर्गत माहुली ट्रान्सपोर्ट, बालाजी ट्रान्सपोर्ट व कोहिनूर ट्रान्सपोर्ट येथेही सखोल तपासणी करण्यात आली. प्लॅस्टिक साठा व वाहतुकीबाबत संबंधितांना कडक सूचना देण्यात आल्या.

या संपूर्ण कारवाईदरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नियोजन, मार्गदर्शन व नियंत्रण केले. त्यांच्या नेतृत्वामुळे ही कारवाई शिस्तबद्ध, पारदर्शक व प्रभावी ठरली.

कारवाईत प्लॅस्टिक कारवाई नोडल अधिकारी विनोद टांक, स्वच्छ भारत मिशन शहर समन्वयक श्वेता बोके, स्वास्थ निरीक्षक सोपान माहुलकर, मिथुन चावरे, दर्शन देशमुख, श्री. कोल्हे तसेच अतिक्रमण विभागाची संपूर्ण टीम सक्रियपणे सहभागी होती.

अमरावती शहरात प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर, साठा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात पुढेही कडक आणि धडक कारवाया सुरू राहणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अमरावती महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top