सार्वत्रिक निवडणूक २०२५ : मनपाचा ‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रम उत्साहात संपन्न; मतदान जनजागृती, आरोग्यदायी जीवनशैली व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे, मतदानाबाबत व्यापक जनजागृती करणे तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजात पोहोचविण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने ‘हॅपी स्ट्रीट’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता शहरातील प्रमुख रस्त्यावर हा उपक्रम उत्साहात पार पडला.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, महिला, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हा उपक्रम अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

‘हॅपी स्ट्रीट’ अंतर्गत चालणे, योगासन, व्यायाम, मुक्त संवाद यांसह मतदान जनजागृतीवर विशेष भर देण्यात आला. लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व, प्रत्येक मतदाराची जबाबदारी आणि सक्षम व पारदर्शक शासन घडविण्यात मतदानाची भूमिका याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी मतदानाची शपथ घेतली. तसेच “मी नक्की मतदान करणार” या संकल्पनेवर आधारित स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत शंभर टक्के मतदानाचा संदेश समाजात पोहोचविला.

निवडणूक जनजागृतीसोबतच आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत नियमित चालणे, व्यायाम व सकारात्मक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.

लोकशाही, आरोग्य आणि सामाजिक सलोखा यांचा सुरेख संगम साधणारा हा उपक्रम नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला.

या उपक्रमास शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ, कैलास कुलट, झीन विजयालक्ष्मी यादव, झीन मोहनिश मिसाल, योगगुरू डॉ. अश्विनी राऊत, योगशिक्षिका सुषमा देऊळकर (शिरभाते) तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमरावती महानगरपालिकेच्या या लोकाभिमुख उपक्रमामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांचा सहभाग निश्चितच वाढेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top