अमरावती महानगरपालिका निवडणूक २०२५ : मतदान कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण संपन्न

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ही पारदर्शक, निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, या उद्देशाने मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी (१, २ व ३) यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सांस्कृतिक भवन व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे हे प्रशिक्षण एकाच वेळी पार पडले. या प्रशिक्षणात विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, मतदार ओळख प्रक्रिया, मतदार यादी हाताळणी, मतदानादरम्यान घ्यावयाची दक्षता, आदर्श आचारसंहितेचे पालन, संवेदनशील परिस्थितीतील कार्यपद्धती तसेच कायदेशीर बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

ITI येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे मतदान कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तांत्रिक अडचणी टाळण्यास मदत होणार आहे.

यावेळी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, मतदान कर्मचारी हे निवडणूक व्यवस्थेचा कणा असून त्यांच्या सजग व जबाबदार कामकाजावरच निवडणुकीची विश्वासार्हता अवलंबून असते.

नियम, कायदे व तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून अमरावती महानगरपालिका निवडणूक २०२५ ही आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रशिक्षण कार्यक्रमास उपायुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या प्रशिक्षणामुळे मतदान प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक व सुरळीतपणे पार पडण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास निवडणूक प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top