अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज कॅम्प रोड येथील महानगरपालिका अंतर्गत असलेल्या गुलाब गार्डनची सविस्तर पाहणी केली.
पाहणीदरम्यान त्यांनी उद्यानाच्या विद्यमान स्थितीचा आढावा घेत सौंदर्यीकरण, दुरुस्ती, नागरिकांच्या सोयीसुविधा व पर्यावरणपूरक विकास यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
आयुक्तांनी उद्यानातील अंतर्गत रस्ते, हिरवळ, संरचना व उपलब्ध सुविधांची तपासणी करून जुनी व खराब झालेली संरचना दुरुस्त करून रंगकाम करण्याचे आदेश दिले.
उद्यान अधिक आकर्षक व निसर्गरम्य दिसावे यासाठी शोभिवंत वेली, फुलझाडे व सजावटीच्या वनस्पतींची लागवड वाढविण्यावर त्यांनी भर दिला.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वेस्ट वस्तूंपासून कलाकृती (रीसायकलिंग आर्ट) साकारण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांसाठी आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी पेंटिंग व भित्तीचित्रे (म्युरल्स) तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
लहान मुलांसाठी आकर्षण वाढविण्याच्या दृष्टीने ट्री हाऊस उभारणीचे नियोजन करण्यास आयुक्तांनी सूचित केले. यामुळे गुलाब गार्डन हे केवळ उद्यान न राहता कुटुंबांसाठी व मुलांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गुलाब गार्डनमध्ये भव्य फ्लॉवरिंग एक्झिबिशन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रदर्शनासाठी फुलझाडांची लागवड, सजावट, प्रकाशयोजना व नागरिकांच्या सोयीसुविधांचा सविस्तर आराखडा तातडीने तयार करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले.
गुलाब गार्डन हे शहरातील एक महत्त्वाचे सार्वजनिक उद्यान असून नागरिकांचे आरोग्य, विरंगुळा व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने त्याचा सर्वांगीण विकास आवश्यक असल्याचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्पष्ट केले. सर्व कामे गुणवत्तापूर्ण, नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.




