अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर, मतदारांमध्ये योग्य माहिती व जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने पत्रकारांसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ई.व्ही.एम.) प्रणालीचे प्रात्यक्षिक आज अमरावती महानगरपालिकेत आयोजित करण्यात आले.
निवडणूक जाहीर झाल्यापासून दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून शहरात आदर्श आचारसंहिता लागू असून, येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे.
यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मतदाराला प्रभागानुसार चार स्वतंत्र मते नोंदवावी लागणार आहेत. ही प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व संभ्रममुक्त व्हावी, यासाठी विशेष जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.
याच अनुषंगाने, माध्यम प्रतिनिधींना मतदान प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा व चार मत प्रणालीची अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवता यावी, या हेतूने 09 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ई.व्ही.एम. प्रात्यक्षिक कार्यक्रम पार पडला.
या प्रात्यक्षिकात अधिकाऱ्यांनी चार मते कशा प्रकारे नोंदवायची, ई.व्ही.एम. वापरताना घ्यावयाची खबरदारी व मतदान प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगितली. उमेदवारांची ओळख सुलभ व्हावी यासाठी बॅलेट पेपरचे रंग गटनिहाय निश्चित करण्यात आले असून—
अ गट : पांढरा,
ब गट : फिक्कट गुलाबी,
क गट : फिक्कट पिवळा,
ड गट : फिक्कट निळा रंग वापरण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास उपायुक्त दादाराव डोल्हारकर, शहरातील प्रमुख पत्रकार, विविध वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांनी प्रत्यक्ष ई.व्ही.एम. हाताळून मतदान प्रक्रिया अनुभवली व चार मत पद्धतीबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मतदारांना महत्त्वपूर्ण सूचना देत सांगितले की, निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा आहे. चार मत प्रणाली असली तरी योग्य माहितीमुळे प्रत्येक मतदार निर्भयपणे व योग्य पद्धतीने मतदान करू शकतो.
मतदान केंद्रावर जाताना वैध मतदार ओळखपत्र सोबत ठेवावे, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र बटन दाबून चारही मते नोंदवावीत, तसेच शिस्त, शांतता व आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.



