अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी शहरातील सर्व प्रभागांमध्ये सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व नियोजित पद्धतीने सुरू झाली आहे.
पहाटेपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून येत असून शहरात मतदानाचा उत्साह वातावरण निर्माण झाला आहे.
या निवडणुकीसाठी शहरात एकूण ८०५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, सावली, तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशिक्षित निवडणूक कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्त आहेत.
दरम्यान, महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
त्यांनी उपलब्ध सुविधा, मतदान यंत्रांची स्थिती व कर्मचाऱ्यांचे कामकाज तपासून आवश्यक सूचना दिल्या.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून नागरिकांनी निर्भयपणे व उत्स्फूर्तपणे मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




