जणगणनेचे काम केवळ माहिती संकलनापुरते मर्यादित नसून सामाजिक जबाबदारीचे भान जपणारे कार्य असल्याचे प्रत्यंतर अमरावती शहरात नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आले.
वार्ड क्रमांक १९ मधील स्वस्तिक नगर परिसरात जणगणनेचे काम सुरू असताना प्रगणकांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचल्याची घटना घडली असून या कार्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांचा अमरावती महानगरपालिकेकडून गौरव करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जणगणनेचे काम करण्यासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षक स्वस्तिक नगर परिसरात घरोघरी जाऊन माहिती संकलन करत होते. यावेळी एका घरामध्ये राहणारी वृद्ध महिला अत्यंत अडचणीच्या अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ मदतकार्य सुरू केले. परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने महिलेपर्यंत मदत पोहोचविण्यात आली व वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचविणे शक्य झाले.
जणगणना कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या सतर्कतेमुळे आणि मानवतावादी भूमिकेमुळे परिसरात त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. प्रशासनाचे कर्मचारी केवळ शासकीय कर्तव्य न बजावता सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या मदतीला धावून येतात, याचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना व्यक्त केली.
या उल्लेखनीय कार्याबद्दल अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते जणगणना कर्मचारी प्रगणक सौ. वैशाली प्रशांत नालसे, पर्यवेक्षक श्री. केशव नरेंद्र पंचारिया तसेच प्रगणक श्री. मनोज नेताजी वाकोडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी बोलताना आयुक्त वर्षा लड्डा यांनी जणगणना कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “जणगणना ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय जबाबदारी आहे. हे काम करत असताना कर्मचाऱ्यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परता प्रशंसनीय आहे. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या मदतीला धावून जाणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.”
या घटनेमुळे जणगणना मोहिमेत कार्यरत कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून त्यांच्या कार्याची शहरभर चर्चा होत आहे.
