शहरातील प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) घटक क्र. ३ अंतर्गत सुरू असलेल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांची अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी आज बुधवार, दि. २७ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता प्रत्यक्ष मौका पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला.
शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित निवास उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या या प्रकल्पांबाबत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या पाहणी दौऱ्यादरम्यान मौजे नवसारी सर्व्हे नं. १२९/२ मधील प्लॉट नं. १०७ ते ११३ येथे उभारण्यात आलेल्या एकूण ४८ सदनिकांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर याच सर्व्हे क्रमांकातील प्लॉट नं. ९१ ते ९७ येथील आणखी ४८ सदनिकांचा आढावा घेण्यात आला.
तसेच मौजे राहटगाव सर्व्हे नं. १९९/३ येथील ४८ सदनिका, सर्व्हे नं. ११६/२ मधील ३२ सदनिका आणि सर्व्हे नं. १२७/२ मधील ८६ सदनिकांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.
सदनिकांमधील बांधकामाची गुणवत्ता, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, स्वच्छता, अंतर्गत रस्ते तसेच इतर मूलभूत सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
पाहणीदरम्यान आयुक्त वर्षा लड्डा यांनी लाभार्थींना हस्तांतरित करण्यात आलेल्या सदनिकांना भेट देऊन रहिवाशांशी थेट संवाद साधला. सदनिकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांबाबत माहिती घेत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अनेक लाभार्थींनी शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे स्वतःचे घर मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
काही ठिकाणी प्रलंबित असलेल्या कामांबाबत नागरिकांनी मांडलेल्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.
यावेळी आयुक्तांनी संबंधित विकासकांना बांधकामाची गुणवत्ता अबाधित ठेवत उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. प्रकल्पांमधील प्रलंबित पायाभूत सुविधा, परिसर स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था आणि सार्वजनिक सुविधा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यावर विशेष भर देण्यात आला. लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सुरू असलेल्या या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे शहरातील अनेक गरजू कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होत असून, या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी सांगितले.


