अमरावती शहरात आज झालेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या.
या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेची यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली असून नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक कॉलला प्रतिसाद देत युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.
शहरातील पाचही झोनमध्ये झाडे पडण्याच्या घटनांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती. अनेक ठिकाणी रस्ते अडथळाग्रस्त झाले होते तसेच वाहतुकीवर परिणाम झाला होता.
महानगरपालिकेच्या पथकांनी घटनास्थळी तत्काळ पोहोचून झाडे व फांद्या हटविण्याचे काम हाती घेतले. एका ठिकाणचे काम पूर्ण होताच पथके पुढील प्राप्त कॉलकडे रवाना होत असून शहरातील प्रत्येक तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, उद्यान विभाग अग्निशमन विभाग तसेच संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्य करत असून नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल यासाठी सर्व उपलब्ध मनुष्यबळ व यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे.
शहरातील शेवटच्या प्राप्त कॉलपर्यंत मदतकार्य सुरू ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.
नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेशी दूरध्वनी क्रमांक 0721- 576426 संपर्क साधावा तसेच मदत कार्यादरम्यान सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सध्या शहरातील पडलेली झाडे हटविण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम वेगाने सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सतत प्रयत्नशील आहे.

