रुक्मिणी नगरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹८ हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे झोन क्र. ३ यांच्या मार्गदर्शनाखाली रुक्मिणी नगर परिसरात आज प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान एकूण १६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत काही ठिकाणी कापडी व कागदी पिशव्यांचा तसेच ५१ मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळून आला. मात्र, एका आस्थापनात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आल्याबद्दल आर्चिस पान सेंटर या आस्थापनास ₹५,००० दंड आकारण्‍यात आला. तसेच विजय काळे, शुभम आदमने व अभिजीत आदमने यांच्याकडून प्रत्येकी ₹१,००० दंड वसूल करण्यात आला. अशाप्रकारे मोहिमेत एकूण ₹८,००० दंडाची वसुली करण्यात आली.

ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली असून, नागरिकांनी व व्यावसायिक आस्थापनांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.

सदर मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले तसेच स्वास्थ्य निरीक्षक विनोद टांक, सुनील चोरपगार, सचिन सैनी, मनीष हडाले, निलेश तंबोले, प्रसाद कुलकर्णी, संजय माहूरकर आणि शैलेश डोंगरे यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top