अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग आला असून पहिल्या टप्प्यातील घरयादी (एचएलबी) आणि गटयादी तयार करण्याच्या कामात मध्य झोन कार्यालय क्र. २, राजापेठ आणि पूर्व झोन कार्यालय, दस्तूरनगर यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे.
दोन्ही कार्यालयांनी शासनाने निर्धारित केलेल्या मुदतीपूर्वीच आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के काम पूर्ण करून शहरातील इतर चार्ज कार्यालयांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
या उत्कृष्ट कार्याची दखल घेत प्रधान जनगणना अधिकारी तथा मनपा आयुक्त श्रीमती वर्षा लड्डा यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून सत्कार केला.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात घरयादी व गटयादी तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे. या टप्प्यात शहरातील प्रत्येक घर, इमारत, व्यावसायिक आस्थापना तसेच इतर वास्तूंची नोंदणी करून त्यांचे डिजिटल दस्तावेजीकरण करण्यात येत आहे.
हे काम १६ मे ते १४ जून या कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार १० जूनपर्यंत सर्व एचएलबीचे काम १०० टक्के पूर्ण होणे अपेक्षित असताना मध्य झोन राजापेठ आणि पूर्व झोन दस्तूरनगर यांनी ७ जून २०२६ रोजीच आपले संपूर्ण काम पूर्ण केले.
त्यामुळे ही दोन्ही कार्यालये जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील कार्य यशस्वीरित्या पूर्ण करणारी शहरातील पहिली चार्ज कार्यालये ठरली आहेत.
मध्य झोन कार्यालय क्र. २, राजापेठ येथे चार्ज अधिकारी भूषण पुसतकर यांच्या नेतृत्वाखालील चमूने नियोजनबद्ध पद्धतीने काम करत अल्पावधीत सर्वेक्षण पूर्ण केले.
या चमूमध्ये उपअभियंता दिनेश हंबर्डे, सहाय्यक चार्ज अधिकारी लक्ष्मण पावडे, जनगणना लिपिक विष्णू लांडे आणि तांत्रिक सहाय्यक हिमानी पुसदेकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
तसेच पूर्व झोन कार्यालय, दस्तूरनगर येथे चार्ज अधिकारी नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना लिपिक अजय चव्हाण आणि तांत्रिक सहाय्यक मनीष कोठेकर यांनीही अत्यंत प्रभावीपणे कामकाज पार पाडत शंभर टक्के उद्दिष्ट गाठले.
सत्कार समारंभात बोलताना आयुक्त श्रीमती वर्षा लड्डा यांनी जनगणना हे केवळ सांख्यिकीय कार्य नसून भविष्यातील विकास आराखड्याचा पाया असल्याचे सांगितले.
शहरातील लोकसंख्या, निवास व्यवस्था, नागरी सुविधा, पायाभूत विकास, शासकीय योजना आणि विविध धोरणांच्या अंमलबजावणीसाठी जनगणनेतील अचूक माहिती अत्यंत महत्त्वाची असते.
त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने जबाबदारीने आणि समर्पित भावनेने हे कार्य पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी दोन्ही चार्ज कार्यालयांच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक करत सांगितले की, वेळेचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि समन्वय यांच्या बळावर ही यशस्वी कामगिरी शक्य झाली आहे. इतर चार्ज कार्यालयांनीही याच पद्धतीचा अवलंब करून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महानगरपालिका क्षेत्रात एकूण पाच चार्ज कार्यालयांमार्फत जनगणनेचे काम सुरू आहे. त्यापैकी दोन कार्यालयांनी १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून उर्वरित तीन कार्यालयांचे कामकाजही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
या कार्यालयांनी सुमारे ९८ टक्के काम पूर्ण केले असून निर्धारित कालमर्यादेत सर्व काम पूर्ण होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
जनगणना मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक करताना प्रशासनाने या कार्याला एक लोकसहभागाची चळवळ म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली.
नागरिकांनीही जनगणना कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
