जनगणना अभियानात पहिल्‍या टप्‍प्‍याचे १०० टक्के काम पूर्ण; महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

अमरावती महानगरपालिकेच्या जनगणना अभियानाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाल्याबद्दल आज शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते संबंधित झोनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

जनगणना अभियान यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या झोन क्र.१ चे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, उपअभियंता आशिष अवसरे व त्यांच्या कर्मचारीवर्गाचा, झोन क्र. ४ चे सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे व त्यांच्या कर्मचारीवर्गाचा, झोन क्र. ५ चे सहाय्यक आयुक्त मनोज शहाळे, उपअभियंता विवेक देशमुख व त्यांच्या कर्मचारीवर्गाचा तसेच झोन क्र.३ चे उपअभियंता नितीन भटकर यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी जनगणना अभियान यशस्वी करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. जनगणना ही शहराच्या विकास आराखड्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया असून सर्वांनी समन्वयाने काम करून अभियान शंभर टक्के पूर्ण केले, ही अमरावती महानगरपालिकेसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच जनगणना अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल शहर जनगणना अधिकारी तथा उपायुक्त योगेश पिठे यांचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शन, नियोजन आणि समन्वयामुळे अभियान निर्धारित वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

सत्कार समारंभात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. उपस्थितांनीही जनगणना अभियानाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील शासकीय उपक्रमांमध्येही अशीच कार्यक्षमता दाखविण्याचा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, शहर जनगणना अधिकारी तथा उपायुक्त योगेश पीठे, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, नितीन बोबडे, उद्यान अधिक्षक अजय विंचुरकर, सहाय्यक शहर जनगणना अधिकारी अक्षय निलंगे, कैलास कुलट, मनपा कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top