आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशावरून शहरातील प्रमुख भागांत घुमंतू अतिक्रमणांवर धडक कारवाई

माननीय आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सकाळी 7.30 ते 10.30 वाजेदरम्यान पोलीस विभाग व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली.

राजकमल चौक, श्याम चौक, तहसील कार्यालय परिसर, जवाहर गेट, इतवारा बाजार, शनी मंदिर परिसर आदी महत्त्वाच्या व गर्दीच्या भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली.

कारवाईदरम्यान अंदाजे 25 ते 30 घुमंतू अतिक्रमणे हटविण्यात आली असून संबंधितांना राजुरा बेडा येथे स्थलांतरित करण्यात आले.

यावेळी अतिक्रमणधारकांनी सार्वजनिक जागांवर साठवून ठेवलेले मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्यही जप्त करण्यात आले. सुमारे एक ट्रक भंगार साहित्य जप्त करून ते कंपोस्ट डेपो येथे जमा करण्यात आले आहे.

शहरातील रस्ते, चौक व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवून वाहतूक सुरळीत करणे तसेच नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने सांगितले.

महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका घेतली असून सायंकाळीही अशाच प्रकारची विशेष कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाचा निर्धार अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांनी सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करू नये व महानगरपालिकेच्या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top