सिताराम बाबा मंदिर, बालाजी प्लॉट परिसरात वादळी वाऱ्यामुळे एक मोठे झाड पडल्याची माहिती प्राप्त होताच अमरावती महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
झाडाचा आकार मोठा असल्याने तसेच परिसरात वीजवाहिन्या व नागरिकांची वर्दळ असल्यामुळे हे काम अत्यंत जोखमीचे व आव्हानात्मक होते.
मात्र उद्यान विभागाने हायड्राच्या सहाय्याने उत्कृष्ट नियोजन, तत्परता व समन्वय राखत झाड सुरक्षितपणे हटविले. या कार्यवाहीमुळे कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही.
या मदतकार्यात एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले. वीजपुरवठ्याशी संबंधित आवश्यक खबरदारी घेऊन त्यांनी उद्यान विभागाशी समन्वय साधला, त्यामुळे संपूर्ण कार्यवाही अधिक सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडली.
महानगरपालिकेच्या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेने वेगाने कार्य करत परिसरातील नागरिकांना दिलासा दिला. संबंधित विभागांच्या दक्षतेमुळे वाहतूक व जनजीवन पूर्ववत करण्यात यश आले.
या उल्लेखनीय कार्यासाठी उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, श्रीकांत गिरी, एमएसईबीचे संबंधित कर्मचारी तसेच उद्यान विभागाच्या संपूर्ण चमूचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.

