रविवारी जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले. अनेक प्रमुख मार्गांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला.
या संपूर्ण परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत अमरावती महानगरपालिका प्रशासनाने तातडीने मदत व पुनर्वसनाची कामे हाती घेतली आहेत.
या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी सकाळी अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी राजापेठ येथील भुयारी गटार तसेच बेलपुरा परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह केलेल्या या पाहणीत त्यांनी विविध समस्यांची माहिती घेत नागरिकांशी संवादही साधला.
पाहणीदरम्यान राजापेठ परिसरातील भुयारी गटार ची तपासणी करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांना भुयारी गटारांची तातडीने स्वच्छता करून पाणी निचऱ्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले.
तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नाल्यांची नियमित साफसफाई आणि देखभाल करण्यावर भर देण्यास सांगितले.
वादळी वाऱ्यामुळे बेलपुरा परिसरातील विविध भागांमध्ये मोठमोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यांवर पडल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या उद्यान विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने रात्रीपासूनच युद्धपातळीवर काम सुरू केले.
कोसळलेली झाडे हटविणे, फांद्या छाटणे आणि रस्ते वाहतुकीसाठी खुले करणे यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
आयुक्त वर्षा लड्डा यांनी पाहणीदरम्यान सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करण्याच्या सूचना दिल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज ठेवण्यास, नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यास आणि संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यास त्यांनी सांगितले.
तसेच आगामी काळात हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यांच्या अनुषंगाने आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शहरातील नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.




