बडनेरा झोनमध्ये प्लास्टिक जप्ती विशेष मोहीम; 20 आस्थापनांची तपासणी, ₹10 हजारांचा दंड

महानगरपालिकेच्या झोन क्र.4 (बडनेरा) अंतर्गत सूतगिरणी चौक ते गोपाल नगर मुख्य मार्ग परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली.

मा.आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे झोन क्र.4 यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान एकूण 20 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत काही आस्थापनांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर तसेच ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी आवश्यक असलेले दोन डस्टबिन नसल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान मोनिका किराणा व जनरल स्टोअर्स येथे प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्याने ₹5,000 दंड आकारण्यात आला. तसेच शुभम पारवे, रवींद्र पारवे, जय भोळे किराणा, पर्वतसिंग राजपुरोहित आणि मोहनजी स्वीट मार्ट या आस्थापनांवर दोन डस्टबिनची व्यवस्था नसल्याने प्रत्येकी ₹1,000 दंडाची कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ₹10,000 दंड वसूल करण्यात आला.

या विशेष मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्हाने, प्लास्टिक स्वास्थ्य निरीक्षक सचिन सैनी तसेच स्वास्थ्य निरीक्षक सोपान माहुलकर, सागर राजुरकर, वैभव खरड, प्रियंका बैस आणि सुमेध मेश्राम यांनी सहभाग घेतला.

महानगरपालिकेने नागरिक आणि व्यावसायिकांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळण्याचे तसेच प्रत्येक आस्थापनात ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी दोन डस्टबिनची व्यवस्था ठेवण्याचे आवाहन केले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top