अमरावतीत पल्स पोलिओ मोहिमेची तयारी; २८ जून रोजी ६७ हजारांहून अधिक बालकांना पोलिओचे दोन थेंब

देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन कायम राखण्यासाठी आणि प्रत्येक बालकाला पोलिओपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने २८ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत मोहिमेच्या नियोजनाचा सखोल आढावा घेण्यात आला असून शहरातील एकही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीस महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, एन.एम.ए. अध्यक्ष डॉ. दिनेश वाघाडे, बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा काळे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विविध शहरी आरोग्य केंद्र उपस्थित होते.

बैठकीत आगामी मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लसीकरण केंद्रांची तयारी, बूथवरील मनुष्यबळ, मोबाईल व ट्रान्झिट पथकांची कार्यपद्धती, दुर्गम व स्थलांतरित कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन, जनजागृती उपक्रम तसेच लसीकरणानंतरच्या अहवाल व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

शहरातील प्रत्येक ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पोहोचावेत, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यंदाच्या मोहिमेत अमरावती शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण ६७,१०७ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शहरभर ३३७ लसीकरण बूथ, १९ मोबाईल पथके आणि २९ ट्रान्झिट पथके कार्यरत राहणार आहेत.

बसस्थानके, रेल्वे स्थानक, प्रमुख चौक, स्थलांतरित वस्त्या आणि प्रवाशांची वर्दळ असलेल्या ठिकाणी ट्रान्झिट पथकांद्वारे बालकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यावेळी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “पोलिओमुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला २८ जून रोजी जवळच्या पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर घेऊन जावे आणि पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत.

नियमित लसीकरण झाले असले तरी पल्स पोलिओचा डोस घेणे तितकेच आवश्यक आहे. शहरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.”

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लसीकरणासाठी आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, वाहतूक व्यवस्था आणि देखरेख यंत्रणा सज्ज असून, सर्व पथकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.

प्रत्येक भागातील बालकांची अचूक नोंद ठेवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. दिनेश वाघाडे आणि बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा काळे यांनीही पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब मिळतील यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून मोहिमेच्या तयारीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. आरोग्य विभाग, महानगरपालिका प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक आणि विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयातून ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती कोवे, डॉ. संदीप पाटबागे तसेच शहरातील १३ शहरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

२८ जून रोजी होणाऱ्या या मोहिमेत पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top