पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच इतर साथीच्या रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने व्यापक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
तसेच शहरातील सर्व प्रभागांमध्ये तातडीने फवारणी, फॉगिंग, डास निर्मूलन, जनजागृती आणि स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश महापौर श्रीचंद तेजवानी यांनी दिले.
यासंदर्भात मंगळवारी (दि. 21 जुलै) अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनात पावसाळ्यातील साथरोग नियंत्रणाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
बैठकीला महापौर श्रीचंद तेजवानी, आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, शेख हमीद शेख वाहेद, नाना आमले, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, नगरसेवक मिलिंद चिमोटे, ॲड. प्रशांत देशपांडे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार पोहनकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शहरातील डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे तातडीने शोधून त्यांचे निर्मूलन करणे, डासांच्या अळ्यांचा नाश करणे, साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे तसेच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे या बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पावसाळ्यात साथरोगांचा धोका वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये कोणतीही कुचराई होऊ नये, यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीत शहरातील प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रत्येक प्रभागात नियमित फवारणी करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
महानगरपालिकेकडे उपलब्ध वाहनावरील फॉगिंग मशिनच्या माध्यमातून नियोजनबद्ध फॉगिंग मोहीम राबविण्यात येणार आहे.
याशिवाय आवश्यकतेनुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीही विशेष फवारणी व फॉगिंग मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
शहरातील ज्या भागांमध्ये पाणी साचलेले आहे, त्या सर्व ठिकाणी मलेरियाविरोधी लार्वीसाईड (एमएलओ ऑइल) टाकून डासांच्या अळ्यांचा नाश करण्याचे निर्देश देण्यात आले.
साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीचा वापर करण्यासह संबंधित विभागांनी समन्वयाने प्रभावी कारवाई करावी, असेही सांगण्यात आले.
साथरोग नियंत्रणासाठी उपायुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय राहिल्यास साथरोग नियंत्रण अधिक परिणामकारक होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
आशा सेविकांमार्फत शहरातील घराघरांत जाऊन कुलर, फुलदाण्या, टायर, रांजण, मडकी तसेच इतर पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
नागरिकांना घर आणि परिसरात पाणी साचू न देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून “एक दिवस – कोरडा दिवस (ड्राय डे)” ही संकल्पना प्रभावीपणे राबविली जाणार आहे.
स्वास्थ्य निरीक्षकांकडून आवश्यक सूचना व नोटिसा देऊन नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
शहरातील पशुधन मालकांनी शेणखत तातडीने उचलावे, यासाठी नोटिसा देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या संदर्भात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
वृत्तपत्रे, पत्रके, बॅनर्स, सामाजिक माध्यमे आणि इतर प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने साथीचे रोग प्रतिबंधक उपाय नागरिकांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत.
नागरिकांनी घरातील शौचालयाच्या व्हेंट किंवा गॅस पाइपवर मच्छरप्रतिबंधक जाळ्या बसवाव्यात, परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये तसेच डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.
याशिवाय शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये आढळणाऱ्या साथरोगांच्या रुग्णांची दैनंदिन, मासिक आणि वार्षिक नोंद ठेवून मागील वर्षाच्या तुलनेत विश्लेषणात्मक अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
या अहवालाच्या आधारे भविष्यातील नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
मे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या माध्यमातून शहरातील स्वच्छता, फवारणी, फॉगिंग आणि साथरोग प्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देशही देण्यात आले.
शहरातील प्रत्येक भागात स्वच्छता आणि डास निर्मूलनाच्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्यावर भर देण्यात आला.
