अमरावती महानगरपालिका हद्दीतील पथदिव्यांच्या खांबांवर तसेच शहरातील प्रमुख चौकांमध्ये अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्समुळे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण होत असून, लोंबकळणाऱ्या केबल्समुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेचे उपमहापौर सचिन भेंडे यांनी मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांना लेखी पत्र देऊन अमरावती-बडनेरा मुख्य मार्गासह शहरातील अनधिकृत व लोंबकळणाऱ्या केबल्स काढण्याची मागणी केली होती.
त्यानुसार, गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी शहरातील प्रमुख चौक असलेल्या राजकमल चौकात मनपाच्या पथकाने कारवाई करत लोंबकळणाऱ्या अनधिकृत केबल्स काढल्या. तसेच वापरात नसलेल्या अनावश्यक डेड केबल्सही कापून हटविण्यात आल्या.
शहरातील विविध भागांत अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्स तसेच लोंबकळत असलेल्या केबल्स संबंधित केबल ऑपरेटर्सनी तातडीने स्वतःहून काढून घ्याव्यात, असे आवाहन अमरावती महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
अन्यथा महानगरपालिकेकडून नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या कारवाईदरम्यान स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, गटनेता नाना आमले, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, उपअभियंता शरद तिनखेडे, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, स्वच्छता निरीक्षक प्रशांत गावनेर यांच्यासह मनपा कर्मचारी उपस्थित होते.


