अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर आज अमरावती शहरात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात व्यापक नियोजन करण्यात आले होते.
नागरिकांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करता यावे, यासाठी शहरातील विविध भागांत कृत्रिम विसर्जन टँक, तसेच प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव येथे कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. या सुविधांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
गणेश विसर्जनाच्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला आणि अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव येथे भेट देऊन पाहणी केली.
यावेळी विसर्जन व्यवस्था, नागरिकांची गर्दी, सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता तसेच भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक सूचनाही देण्यात आल्या.
पारंपरिक जलस्रोतांवरील विसर्जनाचा ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांना आपल्या परिसराच्या जवळच गणेशमूर्तींचे विसर्जन करता यावे, यासाठी शहरातील विविध भागांत कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली होती.
मोठ्या गणेशमूर्ती आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठीही आवश्यकतेनुसार स्वतंत्र नियोजन करण्यात आले होते. विसर्जनानंतर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडूनही विशेष नियोजन करण्यात आले होते. मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून विविध विसर्जनस्थळांवरील व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले.
पाहणीदरम्यान पोलीस आयुक्त राकेश ओला आणि मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून उपलब्ध सुविधांबाबत त्यांची मते जाणून घेतली.
कृत्रिम विसर्जन टँक तसेच प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव येथील व्यवस्थेमुळे मोठी सुविधा झाल्याचे नागरिकांनी सांगत मनपाच्या नियोजनाचे कौतुक केले.
विसर्जनस्थळी स्वच्छता राखण्यासाठी आणि निर्माल्य व इतर पूजेचे साहित्य जलस्रोतांमध्ये जाणार नाही, यासाठीही आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.
कृत्रिम विसर्जन टँक आणि तलाव उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देण्यावर महानगरपालिकेने भर दिला.
दरम्यान, पोलीस आयुक्त राकेश ओला आणि मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी शहरातील सर्व गणेशभक्त आणि नागरिकांना शांतता, शिस्त व स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.
नागरिकांनी शक्यतो आपल्या जवळच्या कृत्रिम विसर्जन टँक किंवा कृत्रिम तलावाचा वापर करावा, विसर्जनस्थळी अनावश्यक गर्दी करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, ध्वनिप्रदूषण टाळले जाईल तसेच महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जावी, असेही त्यांनी सांगितले.
निर्माल्य व पूजेचे साहित्य जलस्रोतांमध्ये न टाकता त्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या स्वतंत्र संकलन व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले. नागरिकांच्या सहकार्याने अनंत चतुर्दशीचा उत्सव शांततेत, सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यावर प्रशासनाने भर दिला.
पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे, भूषण पुसतकर, उद्यान अधीक्षक शैलेश बोरकर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, स्वास्थ्य निरीक्षक, अमरावती शहर समन्वयक श्वेता बोके यांच्यासह महानगरपालिकेचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


