‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत अमरावतीत घरोघरी साचलेल्या कचऱ्याची विशेष मोहीम पूर्ण

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये घरोघरी व परिसरात साचलेल्या कचऱ्याची उचल करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत संबंधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करून साचलेला कचरा तातडीने संकलित करण्यात आला.

या विशेष मोहिमेसाठी स्वच्छता विभागातील अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, बिटप्यून, सफाई कर्मचारी तसेच कचरा संकलन वाहनांचा वापर करण्यात आला.

झोन क्रमांक १ मधील प्रभाग क्रमांक १, २, ३, ५ आणि ६ या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. मनपाच्या पथकांनी संबंधित परिसरात प्रत्यक्ष फिरून घरांमधून तसेच घरांच्या आसपास साचलेला कचरा संकलित केला.

अतिरिक्त वाहनांची उपलब्धता करून देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा वेळेत उचलण्यास मदत झाली.

मोहिमेदरम्यान आरोग्य निरीक्षक आणि बिटप्यून यांनी परिसराची पाहणी करून सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

त्यानुसार कचरा संकलन वाहनांच्या माध्यमातून घराघरांतून कचरा उचलण्यात आला. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊ नये आणि नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी अशा ठिकाणांवरील कचरा उचलण्यास प्राधान्य देण्यात आले.

नियोजनबद्ध पद्धतीने विविध पथकांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्याने मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात आली.

‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून साचलेल्या कचऱ्याची उचल करण्यासोबतच नागरिकांना नियमित कचरा संकलन व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

घरातील कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता तो नियमितपणे मनपाच्या कचरा संकलन वाहनांकडे द्यावा, तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेकडून सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येत असून, ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे संबंधित भागातील स्वच्छतेला गती मिळाली आहे.

स्वच्छ आणि निरोगी शहरासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून, स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून नागरिक आणि प्रशासनाच्या संयुक्त सहभागातूनच शहर अधिक स्वच्छ व सुंदर होऊ शकते, असे मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भूषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, स्वास्थ्य निरीक्षक, बिटप्यून, सफाई कामगार, मनपा कर्मचारी व कंत्राटदार उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top