अमरावती महानगरपालिकेचे नगरसचिव संदिप वडुरकर हे ३० सप्टेंबर २०२६ रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त महानगरपालिका आयुक्तांच्या कक्षात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले होते. यावेळी आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या हस्ते संदिप वडुरकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी संदिप वडुरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. सद्यस्थितीत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय व वाखाणण्याजोगे असल्याचे सांगून, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आनंदमय व निरोगी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नगरसचिव संदिप वडुरकर यांच्याबद्दल असलेले चांगले मत अधोरेखित करताना, एका चांगल्या अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीचे दुःख असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपुलकीने आणि जबाबदारीने कार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले. सेवानिवृत्तीचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो.
त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना योग्य सन्मान देणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपस्थित अधिकारी तसेच सत्कारमूर्ती नगरसचिव संदिप वडुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही नगरसचिव संदिप वडुरकर यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
