स्वच्छ वायु सर्वेक्षणात पहिले पारितोषिक पटकावत अमरावती देशात अव्वल

अमरावती प्रतिनिधी,
स्वच्छ वायु सर्वेक्षण 2025 मध्ये अमरावती शहराने देशभरातील सर्व शहरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिले पारितोषिक पटकावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण अमरावती टीमचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम (NCAP) 2025 अंतर्गत घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये अमरावती शहराने द्वितीय श्रेणी (३ ते १० लाख लोकसंख्या असलेली शहरे) या गटात स्पर्धा करत परिपूर्ण 200/200 गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावले. अमरावतीला ₹७५ लाखांचे रोख पारितोषिक देखील प्रदान करण्यात आले.

हा पुरस्कार ९ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी हा सन्मान स्वीकारला.

अमरावती महानगरपालिकेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम, नागरिकांचे सक्रिय सहकार्य आणि पर्यावरणपूरक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी यामुळेच हे यश शक्य झाले, असे मानले जात आहे.

शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण, रस्ते धूळमुक्त ठेवण्याचे उपक्रम, वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर आणि औद्योगिक भागात प्रदूषण नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना याचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

या यशामुळे अमरावतीने अन्य शहरांसाठी एक आदर्श उभारला असून, स्वच्छ वायु आणि हरित जीवनशैलीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरांमध्ये अमरावतीचे नाव आता अग्रगण्य राहील, यात शंका नाही.

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, स्वच्छ वायु सर्वेक्षण 2025 मध्ये अमरावतीने देशात पहिले पारितोषिक पटकावणे ही संपूर्ण शहरासाठी गौरवाची बाब आहे. ही केवळ महानगरपालिकेची नाही, तर अमरावतीतील प्रत्येक नागरिकाची एक सामूहिक उपलब्धी आहे.

या यशामध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा, अभियंत्यांचा, पर्यावरण तज्ज्ञांचा, आणि सर्वसामान्य नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या शहराच्या वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी आम्ही राबवलेले विविध उपक्रम — जसे की धूळ नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, हरितक्षेत्र वाढवणे, आणि जनजागृती मोहिमा — यांचे सकारात्मक फलित आज आपल्या सर्वांसमोर आहे.

हे पारितोषिक आम्हाला अधिक प्रेरणा देणारे असून, भविष्यातील पर्यावरणपूरक धोरणे अधिक बळकटपणे राबवण्याचा आमचा संकल्प आहे. अमरावतीला देशातील एक ‘हरित आणि स्वच्छ शहर’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

या यशासाठी अमरावतीतील प्रत्येक नागरिकाचे, माझ्या सहकाऱ्यांचे आणि सर्व संबंधित घटकांचे मन:पूर्वक आभार मानते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top