अमरावती प्रतिनिधी,
दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी कॅम्प परिसरातील महिला व बाल विकास विभागामार्फत संचालित संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनी (अभ्यासिका व ग्रंथालय) या ठिकाणी भेट देऊन तेथील सुविधा, व्यवस्थापन आणि परिसराचा आढावा घेतला.
या दौर्यात आयुक्तांनी अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि परीक्षेसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंका व समस्यांवर त्यांनी उपयुक्त सूचना दिल्या आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या अभ्यासपद्धतीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी परिसराची पाहणी करत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. तसेच अभ्यासिकेतील सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आणि आवश्यक बाबी त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ही भेट अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून महानगरपालिकेच्या पुढाकारामुळे भविष्यात आणखी सुधारणा आणि सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनी (अभ्यासिका व ग्रंथालय) भेटीदरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी महत्त्वाचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले की, अभ्यासिकेतील सुविधा वृद्धिंगत करणे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालयामध्ये बसण्याची क्षमता वाढविणे. स्वच्छतागृहांची स्वच्छता व देखभाल नियमित ठेवावी.
ग्रंथालयातील पुस्तके व साहित्य अद्ययावत करणे. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले नविन व अद्ययावत संदर्भग्रंथ उपलब्ध करून देण्यात यावे. ग्रंथालय व्यवस्थापन प्रणाली अधिक सुलभ आणि डिजिटल पद्धतीने कार्यरत करण्यात यावी. विद्यार्थ्यांशी नियमित संवाद व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन तसेच दर महिन्याला विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे व कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे. यशस्वी उमेदवारांचे अनुभव सांगणारे विशेष कार्यक्रम आयोजित करावेत. परिसर स्वच्छता व हरितकरण तसेच अभ्यासिका व ग्रंथालय परिसरात वृक्षारोपण करणे व हरित पट्टा विकसित करणे. विद्यार्थी वाचन करत असताना कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार टाळण्यासाठी देखरेख यंत्रणा सक्रिय ठेवावी. ऑनलाइन अभ्यास साहित्य, ई-बुक्स व डिजिटल लायब्ररी उपलब्ध करून द्यावी. इमारतीतील आवश्यक दुरुस्त्या तत्काळ कराव्यात. अभ्यासिका व ग्रंथालयाच्या इमारतीत आवश्यक दुरुस्ती, रंगरंगोटीसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करून काम हाती घ्यावं.
विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि तयारी हीच आपल्या शहराची खरी संपत्ती आहे. त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे, असेही आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी यावेळी स्पष्टपणे नमूद केले.
संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनी येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आवाहन केले की, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, कठोर परिश्रम करा आणि सातत्य ठेवा. स्पर्धा परीक्षा ही केवळ परीक्षा नसून, तुमच्या जीवनातील मोठं वळण आहे. शासन व महापालिका तुम्हाला आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहेत, मात्र यशाची खरी चावी तुमच्याच हातात आहे. अभ्यास करताना स्वतःवर विश्वास ठेवा, वेळेचा योग्य उपयोग करा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. अपयश आलं तरी खचून न जाता, त्यातून शिकून पुढे जाणं हीच खरी यशाची वाट आहे. संत गाडगेबाबा यांच्या विचारांप्रमाणे समाजासाठी उपयोगी ठरणारी दिशा निवडा. तुमचं यश हे केवळ वैयक्तिक न राहता समाजाच्या विकासासाठीही प्रेरक ठरलं पाहिजे.
महानगरपालिकेच्या वतीने आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या अभ्यासिकेचा जास्तीत जास्त लाभ घ्या, ज्ञान मिळवा, आणि अमरावतीचं नाव उज्वल करा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले आहे.
या कार्यक्रमावेळी उपायुक्त नरेंद्र वानखडे, शिक्षणाधिकारी व महिला व बाल विकास अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, अभियंता राजेश आगरकर, कर्मचारी अमोल साकुरे, श्रीधर हिवराळे, प्रवीण चौधरी, प्रज्वल शेंडे व खुशबू बैस उपस्थित होते.












