अमरावती प्रतिनिधी :
महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच ध्येयाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण अमरावती महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत महिलांसाठी आणि मुलांसाठी तपासणी शिबिरे, जनजागृती कार्यक्रम तसेच विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या अभियानाची उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत: –
या अभियानाचा मुख्य उद्देश देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये महिला आणि मुलांसाठी तपासणी व विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करणे असा आहे.
या मोहिमेत आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये दररोज (AAM-SHC) तपासणी आणि जनजागृती शिबिरे आयोजित केली जाणार आहे.
ग्रामीण रुग्णालये / उपजिल्हा रुग्णालये (CHCs) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे (AAM-PHC/UPHC) येथे विशेषज्ञाव्दारे तपासणी शिबिरे घेतली जाणार आहे.
खाजगी महात्मा फुले जनआरोग्य योजना संलग्नीत रुग्णालये व क्लिनिक येथे देखील विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
या शिबिरांमध्ये विविध आरोग्य सेवा पुरवल्या जातील, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
महिलांची आरोग्य तपासणी:-
उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदानासाठी तपासणी करणे.
तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठीची तपासणी करणे.
जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग (Tuberculosis) तपासणी.
किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया (रक्तक्षय) तपासणी आणि समुपदेशन. आदिवासी भागातील महिलांसाठी सिकल सेल तपासणी कार्ड वाटप आणि आदिवासी भागात सिकल सेल आजाराबाबत समुपदेशन.
माता आणि बाल आरोग्य सेवा :-
गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी (ANC) तपासणी व समुपदेशन करणे. हिमोग्लोबिन तपासणी, तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन.
बालकांचे आवश्यकतेनुसार लसीकरण केले जाईल.
आयुष सेवा :-
या अंतर्गत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिध्द व नॅचरोपॅथी इ. पर्यायी उपचार पध्दतींची सेवा गरजू रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
जनजागृती आणि वर्तणूक बदल संवाद :-
किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्रे आयोजित केली जातील.
महिला बचत गट (SHGs) आणि पंचायत प्रतिनिधींच्या माध्यमातून खाद्यतेल आणि साखरेचा वापर कमी करण्यावर समुपदेशन.
पोषण विषयी समुपदेशन व निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन
रक्तदान शिबीरे :-
१ ऑक्टोबर हा राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिन असून त्याअनुषंगाने राष्ट्रीय महास्वेच्छा रक्तदान या अभियानात राबविण्यात येईल. इंडियन रेड क्रॉस सोसायटी, अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद इ. संस्थांच्या साहायाने १ लाख युनिट रक्त गोळा करण्याचे ध्येय असून, रक्तदात्यांची नोंदणी करण्याचेही प्रस्तावित आहे. My Gov. Portal द्वारे रक्तदान प्रतिज्ञा उपलब्ध करुन देण्यात येईल.
नोंदणी आणि कार्ड वाटप :-
आयुष्यमान भारत डिजीटल मिशन कार्ड (ABDM), पंतप्रधान जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत नोंदणी व आयुष्यमान वय वंदना कार्ड वाटप सर्व गरजू व पात्र लाभार्थ्यांना करण्यात येईल.
क्षयरोग निर्मुलनासाठी निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी :-
क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषक आहार उपलब्ध करुन देण्यासाठी आणि क्षयरोगाविरुध्द जन आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी दानशुर व्यक्ती, संस्था आणि संघटनांना निक्षय मित्र बनवून सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. या करिता माय भारत स्वयंसेवक अथवा इतर स्वयंसेवकाच्या मदतीने निक्षय मित्रांची नोंदणी वाढवण्यात येईल, जेणेकरुन क्षयरोग मुक्त भारताचे ध्येय साध्य करणे शक्य होईल.
तपासणी शिबीरामध्ये (Screening camp) मध्ये आवश्यक असणा-या रुग्णांना विशेषज्ञा कडून तपासणी साठी संदर्भित केले जाईल व त्यांच्या आवश्यक त्या रक्त लघवीच्या तपासण्या, सोनोग्राफी, क्षकिरण तपासणी व शस्त्रक्रिया मोफत व नियोजन करुन करण्यात आले आहे.
या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की, “स्वस्थ नारी, सशक्त परिवार या राष्ट्रीय अभियानाचे उद्दिष्ट महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवणे आणि कुटुंब सशक्त करणे हे आहे. त्यामुळे हे अभियान अमरावती महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून कार्य करावे. आरोग्य शिबिरांमध्ये महिलांची तपासणी, माता-बाल आरोग्य सेवा, ॲनिमिया, क्षयरोग, सिकल सेल तपासणी, तसेच कर्करोग निदान आदी बाबी गांभीर्याने राबविण्यात याव्यात. प्रत्येक शिबिरात तपासणीसोबतच जनजागृती व समुपदेशनावर भर देण्यात यावा. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त जास्तीत जास्त रक्तदाते तयार व्हावेत, यासाठी अधिकारी व स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन कार्ड, पंतप्रधान जनआरोग्य योजना व निक्षय मित्र नोंदणीसाठीही नागरिकांना प्रोत्साहित करावे. या अभियानाचा लाभ प्रत्येक पात्र महिला, बालक व नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांनी समन्वय साधून कार्य करावे.
या मोहिमेद्वारे महिलांचे आरोग्य तपासणी व सक्षमीकरण साध्य होऊन विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात अमरावती महानगरपालिका मोलाची भूमिका बजावणार आहे.
महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आवाहन केले की, “स्वस्थ नारी, सशक्त परिवार या राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य आणि कुटुंबाचे सक्षमीकरण हे उद्दिष्ट आहे. प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आरोग्य तपासणी शिबिरांचा लाभ घ्यावा. महिला, किशोरी, गर्भवती माता तसेच बालकांनी या शिबिरांना उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घ्यावी. यामुळे वेळेत निदान होऊन योग्य उपचार मिळू शकतील. राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि जीवन वाचविण्याच्या या पुण्यकार्याचा भाग बनावे. तसेच आयुष्यमान भारत डिजिटल मिशन कार्ड, पंतप्रधान जन आरोग्य योजना व निक्षय मित्र नोंदणीसाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन आरोग्यदायी आणि क्षयरोगमुक्त समाज निर्माण करण्यासाठी हातभार लावावा. प्रत्येक नागरिकाचा सहभाग हेच या अभियानाचे यश आहे.
सदर सभेला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, IMA प्रतिनिधी, पंजाबराव देशमुख मेडीकल कॉलेज चे प्रतिनिधी, REDCROSS चे प्रतिनिधी, Dental college Dean, बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते, तसेच महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, RCH अधिकारी, मुख्यालयातील अधिकारी आणि सर्व शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.




