अमरावती महानगरपालिकेची नागपुरी गेट चौक ते जमील कॉलनी ते ट्रान्सपोर्ट नगर ते वलगाव रोड, वली चौक परिसरात मोठी अतिक्रमणांवर कारवाई

अमरावती (प्रतिनिधी) :
अमरावती महानगरपालिकेने आज जेसीपीद्वारे नागपुरी गेट चौक ते जमील कॉलनी ते ट्रान्सपोर्ट नगर ते वलगाव रोड, वली चौक परिसरात अतिक्रमणाविरोधात मोठी कार्यवाही राबवली. महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.

सदर परिसरातील रस्ते, फूटपाथ व सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलेली अतिक्रमणे हटवण्यात आली. यामध्ये झोपड्या, शेड, पत्र्याचे शेड, बेकायदेशीर बांधकाम, तसेच व्यवसायिकांनी पसरवलेल्या जागेवरची सामग्री हटवण्यात आली.
या कारवाईमुळे परिसरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाण मोकळे झाले असून वाहतूक सुलभ झाली आहे. नागरिकांच्या तक्रारींनुसार ही मोठी कारवाई करण्यात आली असून अतिक्रमण पुन्हा करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आवाहन केले की, ट्रान्सपोर्ट नगर परिसरात राबविण्यात आलेली अतिक्रमणविरोधी कारवाई ही नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी करण्यात आलेली आहे. रस्ते, फूटपाथ आणि सार्वजनिक ठिकाणे ही सर्वांची सामाईक मालमत्ता असून त्यावर कोणीही बेकायदेशीररीत्या कब्जा करू नये. महानगरपालिकेच्या वारंवार सूचनांनंतरही काही ठिकाणी अतिक्रमण केले जात असल्यामुळे ही कारवाई अपरिहार्य ठरली. नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण टाळून महानगरपालिकेला सहकार्य करावे. शहराचा विकास, स्वच्छता व वाहतुकीची सुलभता यासाठी मनपा प्रशासनाबरोबर प्रत्येक नागरिकाची साथ आवश्यक आहे. अतिक्रमणविरोधी कारवाई सतत सुरू राहणार असून नियमांचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

शहरात अतिक्रमणांची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. रस्त्याच्या कडेला किंवा जागा दिसेल तिथे अतिक्रमणे केली जातात. काही तर पक्के शेड ठोकून अतिक्रमणे करतात. या अतिक्रमणांमुळेच शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आताही महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा या अतिक्रमणांना रडारवर घेतलं आहे. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. पाहता पाहता अतिक्रमणे जमीनदोस्त होऊ लागली आहेत. काही जणांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

महानगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण मोहिम सुरू असून आज दिनांक १६ सप्टेंबर,२०२५ रोजी, सकाळी ११ वाजता पासून जेसीपीद्वारे नागपुरी गेट चौक ते जमील कॉलनी, ते ट्रान्सपोर्ट नगर ते वलगाव रोड, वली चौक पर्यंत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. जोपर्यंत शहरातील रस्ते व फूटपाथ मोकळे होणार नाही तोपर्यंत ही अतिक्रमणाची कारवाई सुरू राहील. ज्यांनी अतिक्रमण केलं असेल त्या सर्वांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा महानगरपालिका प्रशासन काढून घेईल. तसेच कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल असा इशारा अतिक्रमण पथक प्रमुख यांनी दिल्या. या इशाऱ्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ कापड बाजारातील अतिक्रमणांवर देखील लवकरच कारवाई करणार असून त्याबाबत शहरातील इतर भागातील अतिक्रमणे मोकळे करून मुख्य शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करणार असे महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक प्रमुख यांनी सांगितले.

नागरिकांना या अतिक्रमणांचा त्रास सहन करावा लागत आहे. या गोष्टींचा विचार करुनच महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक कारवाई करून अतिक्रमणे काढून घेत आहे.

सदर कार्यवाहीत सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, उपअभियंता विवेक देशमुख, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, निरीक्षक अन्सार अहमद, बबलू सोनवणे, शुभम पांडे, अतिक्रमण विभागातील कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top