अमरावती (प्रतिनिधी) :
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वानिधी) योजनेअंतर्गत अमरावती महानगरपालिकेतर्फे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत लोककल्याण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वानिधी) योजनेअंतर्गत अमरावती महानगरपालिकेतर्फे दिनांक १७ सप्टेंबर,२०२५ रोजी लोककल्याण शिबिर सुरु झाले असून सदर शिबिराला नागरिकांचा उत्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.
या शिबिरामध्ये फेरीवाल्यांना पीएम स्वानिधी अंतर्गत नवीन कर्जाकरिता अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असून, १० हजार रुपयांचे कर्ज फेडलेल्या लाभार्थ्यांना पुढील टप्प्यात २५ हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. तसेच तृतीय टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे.
या लोककल्याण मेळाव्यात पीएम स्वानिधी व्यतिरिक्त इतर ८ शासकीय योजनांचा लाभ देखील फेरीवाल्यांना मिळणार आहे. तसेच बँकांनी ULB कडे परत केलेल्या अर्जांचे निकालीकरण, मंजूर कर्जाचे वितरण, डिजिटल ऑनबोर्डिंग प्रक्रिया, एफएसएसएआयच्या सहकार्याने अन्न प्रशिक्षण, तसेच पथविक्रेत्यांचे सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण या महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध राहतील.
शिबिराचे मुख्य लाभ:
पीएम स्वनिधी योजनेत नवीन अर्ज स्वीकारणे
मंजूर कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ करणे
डिजिटल व्यवहार व ऑनबोर्डिंग प्रक्रियेचे मार्गदर्शन
एफएसएसएआयमार्फत अन्नपदार्थ प्रशिक्षण
८ शासकीय योजनांचा एकत्रित लाभ
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड, बँक पासबुक, व्यवसायाचा फोटो, रेशन कार्ड, ई-श्रम कार्ड
या योजनेचे उद्दिष्ट पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देणे, नियमित परतफेडीस प्रोत्साहन देणे आणि डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे आहे. योजनेला मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ मिळालेली असून पात्र लाभार्थी नव्या अर्जासाठी सुविधा केंद्र तसेच एन.यू.एल.एम. विभाग, राजापेठ, झोन क्र. २ कार्यालयात संपर्क साधू शकतात.
अमरावती शहरातील सर्व पात्र फेरीवाल्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन अमरावती महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.





