अमरावती (दि. १७ सप्टेंबर) :
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धीनंतर दाखल झालेल्या हरकती व आक्षेपांवर आज सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी मा. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या उपस्थितीत सकाळी ११.०० वाजता महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे पार पडली.
प्रभाग रचना संदर्भात नागरिक, जनप्रतिनिधी व विविध सामाजिक संस्थांनी आपले हरकती व आक्षेप सादर केले. सादर झालेल्या निवेदनांची सुनावणी घेण्यात आली. यानंतर पुढील कार्यवाहीसाठी संबंधित प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यावेळी ४० लोकांची सुनावणी घेण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त (प्रशासन) डॉ.मेघना वासनकर, सहाय्यक संचालक नगर रचना अधिकारी सागर वानखडे, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, मनपा कर्मचारी उपस्थित होते.







