अमरावती (प्रतिनिधी) :
अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी नवसारी येथील २ साईट वरील व रहाटगाव येथील १९९, १२७, ११६ या तीन साईट वरील प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) बांधकाम स्थळाची पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान आयुक्तांनी सुरू असलेल्या इमारतींची बांधकामाची गुणवत्ता, साहित्याचा वापर, कामाचा वेग तसेच नियोजनाची सविस्तर माहिती संबंधित अभियंते व कंत्राटदारांकडून जाणून घेतली. प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी अडथळे दूर करण्यावर भर देत त्यांनी ठरलेल्या मुदतीत लाभार्थ्यांना घरे मिळावीत यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी यावेळी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना ही शहरातील गरजू, गरीब व निम्नआय गटातील कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे. शासन व महानगरपालिकेच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हजारो कुटुंबांना सन्मानाचे निवासस्थान उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता वेळेत काम पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
बांधकामाच्या टप्प्यानुसार इमारतींच्या प्रगतीची माहिती घेताना आयुक्तांनी प्रकल्प परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छतासुविधा यांचीही तपासणी केली. रहिवाशांना राहण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला.
प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत उभारल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पामुळे शहरातील असंख्य कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असून ही योजना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी आयुक्तांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सदर नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश संबंधीत अधिका-यांना दिले.
नवसारी व रहाटगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकाम पाहणीदरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश की, कामाची गुणवत्ता सर्वोच्च ठेवावी. बांधकामामध्ये दर्जेदार साहित्याचा वापर करून कुठलाही निकृष्ट दर्जाचा वापर होऊ नये. निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण करावा. लाभार्थ्यांना वेळेत घरे मिळावीत यासाठी कामकाज गतीने व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावे. नियमित आढावा घ्यावा. संबंधित अभियंते व कंत्राटदारांनी दर आठवड्याला प्रगती अहवाल सादर करावा. पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध कराव्यात. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छतासुविधा यावर विशेष लक्ष केंद्रित करावे. लाभार्थ्यांचा विश्वास अबाधित ठेवावा. ही घरे गरजू व निम्नआय वर्गीय कुटुंबांची स्वप्ने पूर्ण करणारी आहेत, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित व दर्जेदार घर मिळाले पाहिजे.
या पाहणीवेळी महानगरपालिकेचे संबंधित विभाग प्रमुख शहर अभियंता रविंद्र पवार, प्रधानमंत्री आवास योजनेचे उपअभियंता लक्ष्मण पावडे, अभियंते, कंत्राटदार व प्रकल्पाशी निगडित अधिकारी उपस्थित होते. अधिकारी व कंत्राटदारांना नियमितपणे कामकाजाचा आढावा घेऊन प्रगती अहवाल सादर करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.














