अमरावती प्रतिनिधी – नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांनी श्री अंबादेवी व एकविरादेवी मंदिर परिसराला भेट दिली. आयुक्तांनी मंदिरात पूजन-अर्चन करून दर्शन घेतले आणि परिसरातील स्वच्छता, व्यवस्था व सुविधा यांची पाहणी केली.
यावेळी, दिनांक २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत श्री अंबादेवी यात्रेत भाविकांच्या आरोग्यसुविधेसाठी भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, या शिबिराचे उद्घाटन आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
आयुक्तांनी शिबिराच्या कार्यप्रणालीची पाहणी करून स्वयं रक्त तपासणी केली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिबिरामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, दंत व नेत्र तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी होते.
आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले की, शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्या, तसेच यात्रेदरम्यान स्वच्छता, सुरक्षा व शिस्तीचे पालन करावे.
हा उपक्रम भाविकांना सुलभ आरोग्य तपासणी व रक्तदानाची संधी उपलब्ध करून देत, नवरात्री उत्सवाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी बनवेल.





