अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानांतर्गत २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आयुक्त सौ. सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांच्या निर्देशानुसार तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यावेळी शहर क्षयरोग अधिकारी डॉ. फिरोज खान, RCH अधिकारी डॉ. स्वाती कोवे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका आणि तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.
शिबिरात जनरल तपासणीसह नेत्रतपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग, त्वचारोग, दंतरोग, क्षयरोग, एनसीडी तपासणी, रक्त तपासणी इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण ६३१ नागरिकांची तपासणी झाली. त्यामध्ये जनरल तपासणी २९५, बालरोग तपासणी १०६, नेत्रतपासणी ८९, दंत तपासणी ४०, त्वचारोग ३१, गर्भवती माता तपासणी २३, लसीकरण २२, एनसीडी तपासणी १६२, रक्त तपासणी ८५, एक्स-रे तपासणी ६० अशा विविध सेवा देण्यात आल्या. याशिवाय १ युनिट रक्तदानही झाले.
लाभार्थ्यांपैकी काहींना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. यात पॅप स्मीअर चाचणी ७, सोनोमॅमोग्राफी ५, मौखिक आरोग्य तपासणी ४० यांचा समावेश आहे. नागरिकांना आवश्यक औषधोपचारदेखील त्वरित उपलब्ध करून देण्यात आले.
या शिबिरात सहभागी झालेल्या तज्ञ डॉक्टर व मनपाच्या आरोग्य विभागाच्या समन्वयातून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा घेतल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.





