स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा मिळावी, आत्मविश्वास वाढावा आणि करिअरमध्ये यश संपादन करता यावे या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेतर्फे २४ सप्टेंबर २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत झालेल्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यशाळेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक सौ. सौम्या शर्मा (चांडक) (2018 UPSC AIR 9) यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना UPSC, MPSC सारख्या परीक्षांची तयारी कशी करावी, अभ्यासातील शिस्त, वेळेचे नियोजन, मानसिक तयारी आणि अपयशातून शिकण्याचे धडे या बाबींवर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “स्पर्धा परीक्षा ही केवळ ज्ञानाची नव्हे तर शिस्त, संयम, सातत्य आणि आत्मविश्वासाची कसोटी आहे. सातत्यपूर्ण परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते.”
या कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी थेट मार्गदर्शन केले. शाश्वत अकॅडमी, पुणे येथील श्री. महेश पाटील यांनी इंग्रजी विषयाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, संभाषण कौशल्य आणि शब्दसंपदा वाढवण्याचे टिप्स दिले. त्यांनी स्पष्ट केले की, “इंग्रजी ही केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्याची किल्ली नाही, तर आत्मविश्वास वाढवणारी भाषा आहे.”
राज्यशास्त्र, संविधान व राजकारण या विषयावर श्री. सुभाष पवार यांनी मार्गदर्शन केले. तर उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत स्पर्धा परीक्षा ही जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांची शिदोरी आहे असे सांगितले.
प्रियंका चव्हाण आणि श्रीमती ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले, तर महिला व बाल विकास अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यासिका केंद्राने परिश्रम घेतले.
या कार्यशाळेसाठी १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे कार्यशाळा संध्याकाळी ५.३० पर्यंत चालली. उपस्थितांच्या समाधानातून या उपक्रमाचे यश स्पष्ट झाले. अमरावती महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या वाटचालीला योग्य दिशा मिळाली.














