नागरिकांच्या तक्रारींना तत्परतेने प्रतिसाद देत अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी २४ सप्टेंबर २०२५ रोजी वारकरी नगर, ज्योती कॉलनी, कुंभारवाडा आणि स्वागतम कॉलनी परिसराचा दौरा करून स्वच्छता, कच्चे रस्ते व नाल्यांची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान आयुक्तांनी परिसरातील साफसफाईची स्थिती, नाल्यांची स्वच्छता व वाहतुकीतील अडचणींचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक रहिवाशांनी सांडपाणी व्यवस्थापन, कच्च्या रस्त्यांवरील खड्डे, नियमित नाल्यांची सफाई आणि कचरा व्यवस्थापनाबाबत आपली अडचण मांडली.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. स्वच्छता विभाग, बांधकाम विभाग, प्रकाश विभाग आणि उद्यान विभागाने समन्वयाने व जबाबदारीने काम करून नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. आयुक्तांनी नागरिकांना आश्वासन दिले की, त्यांच्या मूलभूत सोयी-सुविधा ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असून तक्रारींचे निराकरण विलंब न लावता केले जाईल.
नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी आवाहन केले की, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कचरा वेळेत व ठरलेल्या ठिकाणीच टाकावा, नाल्यात व रस्त्यावर फेकू नये. समस्या आढळल्यास त्वरित महानगरपालिकेच्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.






