अमरावती महानगरपालिकेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली मालमत्ता कर वसुली संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. आयुक्तांनी वसुली पथकांना ठाम शब्दांत इशारा दिला — “कर वसुल करा, अन्यथा कठोर कारवाईसाठी तयार राहा.”
महानगरपालिका क्षेत्रात सुमारे २५०० मालमत्ता धारकांकडे एक लाख रुपयांहून अधिक थकबाकी प्रलंबित आहे. या थकबाकीदारांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांच्या बांधकाम परवानग्या तपासल्या जाणार आहेत. विना परवानगी अथवा अतिरिक्त बांधकाम आढळल्यास MRTP कायद्याअंतर्गत थेट नोटिसा बजावल्या जातील.
बैठकीदरम्यान आयुक्तांनी वसुली लिपिकांच्या कामगिरीचे पुनरावलोकन करताना स्पष्ट केले की, जे अधिकारी किंवा कर्मचारी वसुलीत ढिलाई करतील त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल. मालमत्ता कर महसुलात वाढ करणे हे प्रत्येक वसुली लिपिकाचे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे, अन्यथा प्रशासकीय कार्यवाहीला सामोरे जावे लागेल. विशेषत: झोन क्र. ५ मध्ये कर वसुलीसाठी स्वतंत्र मोहीम राबविण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.
आयुक्तांनी सांगितले की, मालमत्ता कर हा मनपाच्या महसुलाचा मुख्य आधार असून थकबाकीमुळे शहरातील विकासकामांना मोठा अडथळा येतो. कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे; तरीही कर टाळणाऱ्यांविरुद्ध जप्ती, दंडात्मक कारवाई आणि इतर कायदेशीर उपाय हाती घेतले जाणार आहेत.
बैठकीत उपायुक्त नरेंद्र वानखडे, प्रमुख लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, अधिकारी आणि सर्व वसुली लिपिक उपस्थित होते.




